आयकर विभागाचे छापे टाकून घाबरवण्याचा प्रयत्न करू नका

नवी मुंबई : वृत्तसंस्था – आयकर विभाग आणि ईडीच्या धाडींनी विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, विरोधक घाबरणारे नाहीत. उलट तुमच्या पाच वर्षातल्या नटसम्राटगिरीची परफेड मतदार करतील, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, त्यावेळी नाईक बोलत होते.

सद्य स्थितीला एनडीएचे लोक सशाच्या भूमिकेत असून युपीएचे लोक कासवाच्या भूमिकेत आहेत. मात्र यात विजय नेहमी कासवाचाच होतो. कारण पाच वर्षापूर्वी जी आश्वासने दिली होती, त्यातले एकही पूर्ण झालेले नाही, अशी टीका गणेश नाईक यांनी यावेळी केली.

देशामध्ये आयकर विभागाकडून धाडी टाकल्या जात आहेत. सरकारला लक्ष्य करत हा विरोधकांना घाबरवण्याचा रडीचा डाव असल्याची टीका त्यांनी केली. कल्याण लोकसभेतून काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीकडून बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नेवाळी आंदोलनात झालेला अन्याय ग्रामस्थ विसरलेले नाहीत. तसेच नवी मुंबईतून वगळलेल्या १४ गावातले प्रश्नही कायम आहेत. त्यामुळे हे ग्रामस्थ आपल्याला संधी देतील, असा विश्वास बाबाजी पाटील यांनी व्यक्त केला.