माजी आमदाराला डच्चू देत राष्ट्रवादीनं दिलं वडगावशेरीतून सुनील टिंगरेंना तिकीट !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि भाजप नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली विधानसभेची यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये जवळजवळ सर्वच दिग्गजांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अशा सर्वच दिग्गजांना यावेळी तिकीट देण्यात आले आहे.

पुणे खराडी वडगाव शेरीचे प्रथम आमदार बापू पठारे यांना मात्र यावेळी राष्ट्रवादीकडून डच्चू देण्यात आलेला आहे. गेल्यावेळी बापू पठारे यांचा भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांनी पराभव केला होता. तर गेल्यावेळेस शिवसेनेकडून लढलेल्या सुनील टिंगरे यांना यावेळेस राष्ट्रवादीने संधी दिली आहे.

२०१४ च्या विधानसभेला वडगावशेरी मतदारसंघात खरी लढत ही शिवसेना-बीजेपीमध्ये पहायला मिळाली होती. त्यावेळी सुनील टिंगरे हे शिवसेनेकडून लढले होते आणि अवघ्या साडे पाच हजार मतांनी त्यांना पराभव सहन करावा लागला होता. यावेळी मात्र युती झाली आणि ही जागा भाजपला गेली.

खराडी वडगावशेरीचे प्रथम आमदार बापू पठारे यांना गेल्या विधानसभेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच घरातूनच झालेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीने माजी आमदार बापू पठारे यांचे पक्षाने तिकीट कापले आणि थेट सुनील टिंगरे यांना तिकीट देऊ केले.

जगदीश मुळीक यांना तगडे आव्हान
गेल्या विधानसभेत बापू पठारे यांची राष्ट्रवादीत मोठी हवा असतानादेखील आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद या ठिकाणी असूनही सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांना कडवी झुंज दिली होती. त्यामुळे या वेळेसची लढतही घासून होणार असल्याची चर्चा सध्या या मतदारसंघात आहे. जगदीश मुळीक यांची ताकद या मतदारसंघात खूप जास्त आहे. शिवाय मनसे आणि वंचित बहुजन आघाडी देखील निवडणुकीत उतरणार आहे त्यामुळे मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

Visit : Policenama.com