आघाडीतील ‘राष्ट्रवादी’ला ‘सत्ता’स्थापनेचा दावा करण्यासाठी 24 तासांची मुदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. शिवसेनेची बहुमताची गोळाबेरीज झाली असल्याचे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा देण्याबाबत पत्र न दिल्याने शिवसेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न स्वप्नच राहिले. शिवसेनेनंतर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेबाबत निमंत्रण देण्यात आले. मात्र, काँग्रेससोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीला शिवसेनेप्रमाणेच 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.

शिवसेनेने केलेला सत्तास्थापनेचा दावा कायम आहे. मात्र शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे आणि ती मुदत वाढवून देण्यासाठी राज्यपालांनी नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. आता राज्यपाल काय करणार? राष्ट्रपती राजवट लागू करणार की आघाडीला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करणार याची चर्चा सुरु असतानाच राज्यपालांनी आघाडीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. राज्यपालांचे निमंत्रण मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील राजभवनामध्ये राज्यपालांच्या भेट घेतली.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, निवडणूक निकालाच्या 18 दिवसानंतरही सरकार स्थापन करण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिला. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात वाद झाला. भाजपनंतर शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेला निमंत्रण दिले होते. मात्र, मुदत संपल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांकडून निमंत्रण आले आहे. काँग्रेसबरोबर चर्चा करुन पुढील निर्णय जाहीर केला जाईल

Visit : Policenama.com