राजकारण हे नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ठिकाण नाही ; गिरीश बापटांचा पवार घराण्यावर हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस ही पार्टी नसून ही पवारांनी चालवलेली कंपनी आहे. राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ठिकाण नाही अशी टीका गिरीश बापट यांनी पवार घराण्यावर केली आहे. शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय (अ), रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

पवार घराण्यावर टीका करताना बापट म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस ही पार्टी नसून ही पवारांनी चालवलेली कंपनी आहे. राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस संपत चालली आहे. राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ठिकाण नाही. ते त्यागावर आणि समाजकार्यावर उभं असत.’

तर इतिहास तुम्हा – आम्हाला माफ करणार नाही –

पार्थ पवार यांना मावळ मधून लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यावर टीका करताना बापट म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी लादली आहे. ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही तो खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. जो आजोबांच्या आणि वडिलांच्या पुण्याईवर निवडणूक लढवत आहे त्याला समाज मान्य करणार नाही. त्यामुळे राजकारण ज्यांना व्यवसाय आहे त्यांना हद्दपार करण्याची संधी आहे. परंतु, ही संधी गमावली तर इतिहास तुम्हा-आम्हाला माफ करणार नाही.

पुणे मतदार संघातून गिरीश बापट यांची लढत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्याशी होणार आहे.