पार्थ पवार पंढरपुरातून पोटनिवडणूक लढवणार ? जयंत पाटील आणि रोहित पवार म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पार्थ पवार यांना पंढरपूर विधानसभेच्या पोट निवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले.

यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. पार्थ यांच्या उमेदवारी बाबत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. अशी कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झालेली नाही. पार्थ पवार यांना तिकीट देयचे की नाही याबाबतचा निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेते बसू घेतील. अमरजित पाटील यांनी पार्थ पवार यांना पंढरपूर येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याची मागणी केली होती.

मागणी केली म्हणून लगेच पूर्ण होत नाही – रोहित पवार

पार्थ पवार आमदारकीची निवडणूक लढवणार का ? यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, पार्थ पवार यांना उमेदवारी द्यायची की नाही, याबाबत शरद पवार साहेब, अजितदादा आणि तिथले पालकमंत्री निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेत असतात. योग्य तो न्याय तिथे असलेल्या लोकांना दिला जाईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कोणी अशी मागणी केली, म्हटलं म्हणून लगेच ती पूर्ण होईलच असंही नाही, असेही रोहित पवार म्हणाले. रोहित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.