जयंत पाटलांची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका, म्हणाले – ‘महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला अन् निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का ?

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पवारांना काढला होता, त्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यातल्या एका अतिशय चांगले काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल करत जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादावर बोचरी टीका केली. मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ जीवापाड जपला त्यांना बाजुला करुन प्रसंगी आपल्या अधिकाराचा वापर करून चंद्रकांतदादांनी निवडणूक लढवली अन् त्याचा फायदाही त्यांना झाल्याचे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना पक्ष कसा टिकवायचा याची चिंता पडली आहे. त्यामुळे पाहिजे तसे ते वारेमाप बोलत सुटले आहेत. ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रियता मिळवली त्यावर आयत्या बिळावर नागोबासारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची माप काढणे बंद करावे. विरोधी पक्षात आहात जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाही. पण चुकीचे बोलणार्‍यांचे इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.