आणि सांगा आम्ही बेरोजगार तरूणांनी पोट कसं भरायचं ? राष्ट्रवादीचं ‘रॅप साँग’ अन् भाजपवर ‘घणाघात’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ या गाण्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारांना साद घातली आहे. तर आता सरकारला प्रश्न विचारणारे राष्ट्रवादीचे रॅप साँग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विकासाच्या नावाखाली राज्य तुम्ही करायचं, आणि सांगा आम्ही बेरोजगार तरुणांनी पोट कसं भरायचं? असा प्रश्न रॅप साँगच्या माध्यमातून सरकारला विचारण्यात आला आहे.

तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यात वादळ उठले. या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने रॅप साँगच्या माध्यमातून सध्याच्या बेरोजगारीवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी रॅप साँगचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

काय आहे व्हिडीओत ?
राष्ट्रवादी व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये रोजगार नाही, महागाईचा भडिमार होतोय, श्रीमंतांच्या खाली गरिब कामगार दबला जातोय अशी परिस्थिती या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. तसेच अब की बार, अब की बार म्हणत गंडवलंय बार बार, अशा शब्दात भाजपचा समाचार घेण्यात आला आहे. तर सामान्यांना खायला तूरडाळ नाही असे दाखवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हे मेजवानीमध्ये गुंग असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Visit : Policenama.com