अजित पवारच उपमुख्यमंत्री ? सरकारी हालचालींना आलाय भलताच ‘स्पीड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मागील आठवड्यात 28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेलं सत्तानाट्य आता अखेर संपलं आहे. शपथविधीनंतर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन होऊन सरकारचे कामकाज सुरु झाले आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र सरकारी पातळीवरील काही हालचालींनी अजित पवारच उपमुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या सत्तावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून, त्याबाबतचा निर्णय नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर म्हणजे 22 डिसेंबरनंतर पक्षश्रेष्ठी घेतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून गोंधळ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार यांना ही जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरु आहे. तसेच जयंत पाटील हेही या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहेत.

शासनाकडून दालन वाटप करताना मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील सहाव्या मजल्यावरील मुख्य इमारतीतील मोठे दालन अद्यापपर्यंत कुणालाही देण्यात आलेलं नाही. नव्याने सहा मंत्री शपथ घेतलेल्या कोणत्याही मंत्र्याला हे दालन दिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठीच हे दालन रिक्त ठेवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Visit : policenama.com