‘या’ कारणामुळं अजित पवारांचा राजीनामा, चर्चेला उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट देण्याची खेळी संपत नाही तोच राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. या राजीनामा नाट्यानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल झाले आहेत. परंतु अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली असल्याचेही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले आहे.

काय होता शिखर बँक घोटाळा?
आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. यामध्ये २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप आहे. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते.