अजित पवारांची मोदींवर घणाघाती टीका

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे थापेबाजी करणारं असून त्यांनी थापेबाजी करत जनतेची केवळ फसवणूक  केली आहे. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे . राष्ट्रवादीच्या एका मेळाव्यात ते बोलत होते .  यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे .  विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेका विरूद्ध लढली तरी आता एकोप्याने भाजप-शिवसेनेशी लढू असंही ते यावेळी म्हणाले .  इतकेच नाही तर,  डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून त्यांनी काँग्रेसलाही टोले लगावल्याचे दिसून आले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ” ग्रामपंचायत , मार्केट कमिटी , बँक , विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढले .  पण आता एकोपा दाखवू . आता आचारसंहिता लागू झाली आहे .  त्यामुळे आता नोकऱ्या लावा, बदली करा अशी कामे घेऊन येऊ नका .  फी मध्ये सवलत वगैरे असे अर्ज घेऊन येऊ नका .  उमेदवारी अर्ज भरायला येताना स्वतःचं वाहन असेल तर पेट्रोल ,  डिझेल स्वतःच्या पैशाने भरून या .  दुष्काळ असला तरी सरकार छावण्या काढू देत नाही . कारखाने बंद आहेत , चारा नाही त्यामुळे शेतकरी संकटात आहे . दुधाचे 5 रुपये अनुदान तरी सरकारने दिले पाहिजे. ” असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

‘मुलगा भाजप मध्ये गेला आता वडिलांनी सेनेत यावं’

सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर टीका करताना अजित पवार म्हणाले की, “वडील म्हणाले मुलगा आई वडिलांचं ऐकत नाही म्हणे ,  मग मतदारांना कसं समजवणार  ? मतदार म्हटले तर पोरग  तुमचं ऐकत नाही आम्ही का ऐकावं ? शिवसेना म्हणतेय मुलगा भाजप मध्ये गेला आता वडिलांनी सेनेत यावं.” असे म्हणत त्यांनी विखे यांच्यावर आपली तोफ डागली.
‘सरकारने जनतेची फसवणूक केली’
पुढे बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला . ते म्हणाले की, “15 लाख कसे द्यायचे म्हणून नोटबंदी केली. नोटबंदी केली तर काळा पैसा बाहेर येईल परंतु असं काहीच झालं नाही. उलट सरकारने जनतेची फसवणूक केली . सुप्रियाच्या विरोधात उमेदवार कोण ? यावर ते रोज वेगवेगळी नावे सांगत आहेत . परंतु गाफील राहू नका.” असेही पवार म्हणाले.
‘त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे’

शिवसेनेवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, “गेली 20 वर्षे झालीत मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. परंतु त्यांना साधे पूलही दुरुस्त करता येत नाही .  त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे.”  याशिवाय,  ‘आम्हाला अच्छे दिन नको आहेत . जे पहिले होते तेच दिवस परत द्या असं लोक म्हणत आहेत’ असंही अजित पवार म्हणाले.