‘फडणवीसजी, नाक घासून माफी मागा, नाहीतर…’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या एका ट्विटमुळे टीका होत आहे. छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा 6 मे रोजी स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने फडणवीस यांनी ट्विट करून अभिवादन केले. मात्र, त्यात झालेल्या चुकीमुळे फडणवीस यांच्याविरोधात रोष व्यक्त होत आहे. त्याच मुद्यावरून राष्ट्रवादीने फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन केले होते. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. त्याचबरोबर अनेकांनी माफीची मागणीही केली. याच ट्विटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करून टीका केली आहे. फडणवीसजी तुमचे पूर्वज शाहू महाराजांकडे कार्यकर्ते म्हणून झाडू मारायला होते, हे विसरू नका.

जाणीवपूर्वक केलेल्या या चुकीची छत्रपती शाहू स्मारकावर नाक घासून माफी मागा, नाहीतर तुमचे कार्यकर्ते तुम्हाला महाराष्ट्र ट्रोल करतोय म्हणून परत निवेदन सादर करायला जातील, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. या ट्विटवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही.

संघानं मनुवाद आणायचा असल्यानं महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!, असं ट्विट करत सावंत यांनी टीका केली आहे.