’तुमच्यातीलच एखादा ज्योतिरादित्य होईल…’ अजित पवारांची ‘बॅटिंग’ ! विरोधकही हसून झाले ‘लोटपोट’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही कोणी तरी ज्योतिरादित्य शिंदे होईल, असे म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर देत तुफान फटकेबाजी केली. अजित पवार म्हणाले, तुम्ही काही म्हणालात तरीही आमच्याकडे कोणीही ज्योतिरादित्य होणार नाही. तुम्हीच जरा काळजी घ्या, नाहीतर तुमच्यातच कोणीतरी ज्योतिरादित्य होईल. तुमचे आमदार कधीही उधळतील, त्यांना सांभाळा.

अजित पवार म्हणाले, राज्यातही कोणीतरी ज्योतिरादित्य शिंदे होईल असं म्हणत पुढली पाच वर्ष तिथंच काढलीत तरी चालतील. असं सांगतंच तुम्हाला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. नाही तर तुमचीच माणसं इकडं तिकडं जातील. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा, असे म्हणत अजित पवारांनी मुनगंटीवारांना प्रत्युत्तर दिले.

सध्या विधानसभेत बरेचजण गैरहजर आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवा, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपाला डिवचले. अजित पवार यांचे हे भाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अजित पवार यांनी आमदारांना झालेला निधी वाटप आणि फडणवीस यांच्यासोबत घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ यावरही भाष्य केले.

सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले होते की, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आम्ही जे काही ठरविले होते, त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारकत घेतली. त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी फारकत घेतली. आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच, असे मुनगंटीवार यांनी म्हटले होते. पक्षातीलच नेत्यांना मुनगंटीवार यांनी आपल्या वक्तव्याने अडचणीत आणत त्यांना घरचा आहेर दिला होता. राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेत मुनगंटीवार बोलत होते.