‘पार्थ पवार माझे चांगले मित्र, ते चुकीचं पाऊल उचलणार नाहीत’, महाविकासमधील ‘या’ दिग्गज मंत्र्यानं व्यक्त केला ‘विश्वास’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘माझा नातू पार्थ पवार हा अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराचे समर्थन व सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना फटकारले. त्यानंतर पार्थ नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. तसेच ते काय भूमिका घेणार याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर आपले मत व्यक्त केलं आहे.

राजेश टोपे जालन्यात बोलत होते. ते म्हणाले, ‘पवार कुटूंब हे आदर्श कुटूंब असून सर्वकाही व्यवस्थित होणारच आहे. पवार कुटूंबियांशी माझे दोन पिढीचे कौटुंबिक संबंध आहेत. पार्थ पवार माझे चांगले मित्र आहेत ते काहीच चुकीचं पाऊल उचलणार नाही,’ असा विश्वास टोपे यांनी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, शरद पवार यांच्या विधानानंतर अजित पवार, पार्थ पवार यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. तसेच राष्ट्रवादीचे नेते पार्थ आणि अजित पवार हे नाराज नसल्याचं सांगून आजोबांना नातवाला बोलण्याचा अधिकार आहे म्हणत सारवा सारव करताना दिसत आहे. तर आज बारामतीत पार्थ पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार हे अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास यांच्याकडे दुपारचं जेवण घेण्यासाठी एकत्र जमणार आहेत. म्हणजे हे घरगुती स्नेहभोजन आहे. पण काल पुण्यात पार्थ यांनी प्रताप पवार आणि अभिजित पवार यांनी भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.