NIA नं तपास पूर्ण करुन बोलावं, उगाचं रोज बातम्या पसरवू नयेत – जयंत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी एनआयएने अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत एनआयएने निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच बोलावे. दररोज विनाकारण विविध बातम्या पसरवू नयेत, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यामुळे तपास यंत्रणेविषयी काहीच माहित नसलेल्या लोकामध्ये चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे NIA ने संपूर्ण तपास करून अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे, असे पाटील यांनी म्हटले.

जयंत पाटील यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. मात्र, उगाच बातम्या सोडू नयेत. सगळ्या पुराव्याआधारे एनआयएने निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राज्य सरकार संबंधित दोषीवर कारवाई करायला तयार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. शिवसेनेकडून वाझे यांना पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याने चूक केले त्याला शिक्षा होणारच असल्याचे पाटील म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून भाजपचे नेते सातत्याने सरकार कोसळणार असल्याचे बोलतात. या अधिवेशनात भाजप पहिल्यांदाच विरोधी पक्षाप्रमाणे वागताना दिसला. देवेंद्र फडणवीस यांना खात्री झाली आहे की, आपल्याला पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षातच बसायचे आहे. त्यानुसार त्यांनी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडली. हे त्यांनी नेहमी करावे, विरोधी पक्षात बसण्याची सवय फडणवीसांनी अंगवळणी पाडून घ्यावी, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.