‘पडळकरांना नशा चढलीय, पवारांच्या अनुभवापुढे ते डासा एवढेही नाहीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे म्हटले होते. याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन केले. त्यातच आता गोपीचंद पडळकरांच्या विधानावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील जळजळीत टीका केली आहे.

आमदार होऊन आठ दिवस झालेत, तोवर पडळकरांना नशा चढली आहे. भाजप आणि पक्षातील उच्चवर्णियांच्या संकुचितपणाची त्यांना अजून पुसटशी ओळखही नाही, असे म्हणत गोटे यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मी अनेकदा शरद पवारांवर टीका केली. गेली 10 महिने मी त्यांच्यासोबत काम करत आहे. दिलेल्या शब्दाला जागणे, मनात द्वेष न बाळगणे ही त्यांची विशेषत: आहे. शरद पवारांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या जेवढी राष्ट्रवादीत आहे त्यापेक्षा दुप्पट लोक अन्य पक्षातील आहेत, जे त्यांच्यावर प्रेम करता, असं गोटी यांनी म्हटले.

एकनाथ खडसेंबाबत गौप्यस्फोट
पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली. यावरून त्यांची राजकीय पात्रता, मनाची क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासा एवढेही नाहीत. डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही. त्याला हीटचा फवारा पुरेसा असतो, असे गोटे यांनी म्हटले आहे. तसेच प्रारंभीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कारस्थान यांनीच रचल्याचा गौप्यस्फोट देखील गोटे यांनी केला.

फडणवीसांवर टीका
फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे असे म्हणणार नाही. एकही धनगर विधानसभेत येऊ नये यासाठी केलेली कारस्थाने, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे त्यांचे केलेले उद्योग मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात मुसलमान आला तरी चालेल पण अनिल गोटे येता कामा नये यासाठी पैशांचा महापूर आला होता. असे अनिल गोटे यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.