‘फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला ‘महारोग’, पण मी असं म्हणणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत,’ असे गंभीर स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी देखील गोपीचंद पडळकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, पण मी असं म्हणणार नाही,’ असा टोला त्यांनी लगावला.

अनिल गोटे म्हणाले कि, ‘फडणवीसांनी माझ्याशी केलेला विश्वासघात जगजाहीर आहे. एकही धनगर व्यक्ती विधानसभेत येऊ नये, यासाठी केलेली कारस्थाने आणि विरोधकांना बळ देण्यासाठी केलेले उद्योग मला माहित आहे. माझ्या मतदारसंघात ‘मुसलमान आला तरी चालेल, पण अनिल गोटे येता कामा नये’ यासाठी पैशांचा महापूर आला होता. तरी मी संतापामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, पण मी असं म्हणणार नाही, ‘ दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर गोटे यांनी पत्रक जारी करत फडणवीसांवर टीका केली.

गोपीचंद पडळकरांना टीका करत म्हंटले की, आमदार होऊन आठ दिवस झाले नाहीत तर पडळकरांना नशा चढली आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षातील उच्चवर्णियांच्या संकुचिपणाची त्यांना अजून पुसटशी ओळखही नाही. मी अनेकदा शरद पवारांवर टीका केली. मात्र, गेली 10 महिने मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. दिलेल्या शब्दाला जागणे, मनात द्वेष न बाळगणे ही त्यांची विशेषता आहे. पवारांवर प्रेम करणारांची संख्या जेवढी राष्ट्रवादीत आहे, त्यापेक्षाही दुप्पट संख्या अन्य पक्षात आहेत. तसेच पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली. यावरुन त्यांची राजकीय पात्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत. डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही. त्यासाठी केवळ हीटचा फवारा पुरेसा असतो, असा टोला गोटे यांनी लगावला.

गोपीचंद पडळकरांनी काय केलं होत विधान –
गोपीचंद पडळकर यांनी टीका करत म्हंटले कि, ‘शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या समूह घटकांना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचं , ही त्यांची भूमिका आहे. मला वाटत नाही कि, धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील. देवेंद्र फडणवीस सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका केली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं.