शरद पवार यांच्यानंतर आता छगन भुजबळांचा पार्थ पवारांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी युवा नेते आणि नातु पार्थ पवार यांना खरमरीत शब्दात सुनावल्यानंतर पक्षात चांगलीच खळबळ उडाली. पार्थ हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचं शरद पवारांनी म्हटल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनीही पार्थ पवार यांना टोला लगावला आहे.

छगन भुजबळ यांनी पार्थ पवारांना उद्देशून ‘नया है वह’ असं म्हटलं आहे. त्यामुळे आगोदरच शरद पवारांनी पार्थ यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत असताना भुजबळांनी टोला लगावल्याने आता पुन्हा पक्षांतर्गत वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना भुजबळ यांनी पक्षाची बाजू सावरण्याचाही प्रयत्न केला आहे. पवार कुटुंबीयांमध्ये कोणतेही वाद नाहीत. अजित पवार नाराज नाहीत. कुटुंबात एखाद्याला काही सांगण्याचा अधिकार आहे. सुशांत सिंह राजपुत प्रकरणी आदित्य ठाकरे यांचाही काहीही संबंध नसल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले शरद पवार ?
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार बोलत होते. पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत. सीबीआयबाबत ते बोलले आहेत तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही, असे शरद पवार म्हणाले. याचबरोबर मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांना 50 वर्षे ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

जयंत पाटलांचा खुलासा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचा कठोर शब्दांत समाचार घेतल्यानंतर पार्थ यांचे वडील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. यावेळी जयंत पाटील, सुप्रीया सुळे हे देखील उपस्थित होते. दीड तास चाललेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, पवार हे कुटुंबाचे ज्येष्ठ नते आहेत. ते बोलू शकतात. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, ही बैठक अगोदरच ठरली होती. यात पार्थ प्रकरणावर चर्चा झाली नाही तर इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच पार्थ पवार यांच्याकडून पक्ष स्पष्टीकरण मागणार का असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले, असं कोणतंही स्पष्टीकरण मागण्याचा प्रश्नच येत नाही. पार्थ यांनी जर एखादी मागणी केली असेल तर तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. त्याला पक्षाशी जोडण्याचे कारण नाही.