अखेर छगन भुजबळांचा शिवसेना प्रवेश निश्‍चित, ‘या’ दिवशी शिवबंधनात !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश अखेर निश्चित झाला असून ते उद्या दुपारी म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र त्यांच्याकडून या संदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र आता ते प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि नेत्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र छगन भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भुजबळ उद्या पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते येणार असून ते मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. छगन भुजबळ यांनी 28 वर्षांपूर्वी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यानंतर मागील 20 वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

सुप्रिया सुळेंच्या यात्रेला देखील अनुपस्थिती –

सध्या संवाद यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याबरोबर देखील ते कोणत्याही कार्यक्रमात दिसून आले नसून नाशिक जिल्ह्यात यात्रा आली असता छगन भुजबळ त्यांच्याबरोबर दिसले नाहीत. छगन भुजबळ यांच्या हाती नाशिकमधील सत्ता अनेक वर्ष होती. त्याचबरोबर नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र आता पक्ष संकटात असताना ते पक्षाला वाऱ्यावर सोडून चालले आहेत.

दरम्यान, भुजबळ यांच्या पक्षप्रवेशाला नाशिक जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी विरोध केला होता. मात्र तरीदेखील भुजबळ यांना शिवसेना प्रवेश दिला जात असल्याने हे कार्यकर्ते तसेच नेते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –