जितेंद्र आव्हाडांची जागतिक आरोग्य संघटनेवरच टीका !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत जगात १३,४७१,८८१ जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. तर ५८१,५६५ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवरती जागतिक आरोग्य संघटनेकडून परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जागतिक आरोग्य संघटनेवरती टीकास्त्र सोडलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं मंगळवारी सर्व देशांना इशारा देत, मूलभूत नियमांचं पालन न केल्यास त्याचे परिणाम गंभीर ते अतिगंभीर होतील असं सांगितलं होत. यावरुन आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, “सुरुवातीपासूनच कोरोना संसर्ग माहामारीच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटना नागरिकांना धीर देण्याऐवजी घाबरवण्याचं काम करत आहे. सुरवातीस कोरोना संसर्ग तितका धोकादायक नसल्याचं त्यांनी म्हटलं होत आणि सतत ते आपलं वक्तव्य बदलत आहेत.” असं म्हणत जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभारावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

काय म्हटलं होत जागतिक आरोग्य संघटनेने?

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून चिंताजनक होईल असा इशारा दिला होता. जर देशांनी आरोग्याशी संबंधित पूर्व काळजी घेतली नाही तर महामारी अजून गंभीर रुप धारण करेल, अशी भीती त्यांनी व्यक्त करत इशारा सुद्धा दिला होता. “जर मूलभूत नियमाचं पालन केलं नाही तर महामारी गंभीर, गंभीर आणि अतिगंभीर रुप धारण करेल” असे सांगत अनेक देश चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत हे मला स्पष्ट करायचं आहे, असं टेड्रोस म्हणाले होते.