विधानसभेआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का ? ‘या’ बड्या नेत्यानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विरोधी पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. मात्र या सगळ्यात कालच विरोधकांची मुंबईत बैठक पार पडली असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत महाडिकांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाडिक यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे.

जयंत पाटील यांनाही भीती

निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची भीती याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली होती. भाजपला मिळालेल्या यशामुळे काही आमदार असा निर्णय़ घेऊ शकतात. यामध्ये कमी मताधिक्क्याने निवडून आलेले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकतील,’ असे देखील त्यांनी म्हटले होते. त्यामुळे कमीतकमी आमदार जातील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते.

दरम्यान, यावर्षी दिवाळीत विधानसभेच्या निवडणूक होत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार फोडून त्यांना शह देण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे बोलले जात आहे.