भाजपाच्या ‘वाटे’वर गेलेल्या ‘त्या’ सर्वांची ‘वाट’ लागली, धनंजय मुंडेंची ‘खरमरीत’ टीका

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – एकदा चक्र फिरलं की सगळच बिघडत जातं. भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे ज्यांना ज्यांना वाटले ते भाजपच्या वाटेवर गेले. सत्तेसाठी जे भाजपच्या वाटेवर गेले त्यांची वाट लागली अशी खोचक टीका राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक, कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2020 या कार्यक्रमात बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणाले, वडतुले यांनी राजीनामा दिल्याचे निकालाच्या दिवशी समजले. निवडणूक एवढी शिगेला पोहचली होती की त्यांनी राजीनामा का दिला हे त्यांच्या मतदारसंघात देखील समजले नाही. सत्तांतराच्या वेळी काय वातावरण हे आपण सर्वांनी बघितलं आहे. राज्यमंत्री म्हणून काही गोष्टी स्पष्टपणाने बोलता येत नाहीत. समजून घेण्यासाठी आपण सूज्ञ आहातच.

चार पाच दिवसांनी ज्यांनी मतदान केले त्यांची भावना बदलली. राज्यातील बहुसंख्य मतदारांची एका पक्षाला बाजूला ठेवण्याची भावना होती. चार पाच जण एकत्र या आणि सत्ता स्थापन करा. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवा अशी भावना होती. म्हणूनच तुमच्या भावनेतून निर्माण झालेले हे सरकार आहे. हे सरकार तुमच्या भावना कधीही दुखावणार नाही. बीड जिल्हा मागासलेला असल्याचा कलंक कधीच आपल्याला पुसता आला नाही. आता सत्तेच्या पाच वर्षात बीड जिल्ह्याला लागलेला कलंक पुसून टाकू असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.

पंकजा मुंडेंवर निशाणा
बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत भावनेचे राजकारण झाले. का झालं कस झालं हा माझ्यासाठी चर्चेचा विषय नाही. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात विकासाचं राजकारण होतं. यापुढे बीड जिल्ह्यात देखील विकासाचं राजकारण होईल, असे सांगत त्यांनी पकंजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

फेसबुक पेज लाईक करा –