‘कसं काय शेलार बरं हाय का ? कमळाबाईचे काही खरं हाय का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेचे नेते धनंजय मुंडे हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. आपल्या आक्रमक भाषणाच्या शैलीमुळे ते सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याच प्रयत्न करीत असतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यावर अचूक नेम धरतात. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष करत ट्विटरवरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. सत्तेसाठी आमच्या पक्षातील नेते फोडले यावरून धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे.

राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवरुन धनंजय मुंडे यांनी भाजपला टार्गेट केले आहे. काही दिवसांपूर्वी बीडमधले राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. तसेच माढा मतदारसंघातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. यावरून धनंजय मुंडे यांनी भाजपाला आमच्या पक्षातील विझलेले दिवे घेऊन तुमच्या घरात उजेड पडेल काय असा टोला लगावला आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे ट्विटमधून
कसं काय शेलार बरं हाय का ?
कमळाबाईचे काही खरं हाय का ?

काल म्हणे तुमची हद्दच झाली
सत्तेसाठी आमची पक्षफोडी केली

वागणं तुमचं हाय रं गैर
आता तुमची नाय रं खैर

नेहमीच तुम्ही
खेळतात कावे
काय हाय उपयोग
घेऊन विझलेले दिवे ?
तुमच्या घरात त्याचा
उजेड पडल काय ?
कमळाबाईचे काही
खरं हाय का ?

आशिष शेलार यांनी मनसे-राष्ट्रवादी यांना टार्गेट करत शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीचे बोरं असे ट्विट करत टीका केली होती. आशिष शेलार यांच्या ट्विटला धनंजय मुंडे यांनी ट्विट करत उत्तर दिले, ‘काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रिपद दिल जायना, शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले, प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातलेच कवी आठवले’, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आशिष शेलारांना चिमटा काढला आहे.