राष्ट्रवादी संपवणे ‘चिक्की’ खाण्याएवढे सोपे नाही : धनंजय मुंडे यांची खरमरीत टीका

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही अशी राजकीय चिथावणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिंद्रुड येथील एका कार्यक्रमादरम्यान दिली होती. आता त्यांना जळजळीत उत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची भाषा बीडमधील नेते करतात, मात्र लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस संपवणे चिक्की खाण्याएवढे सोपे नाही” असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. परळी यथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.
हिम्मत असेल तर सामोरासमोर या … 
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये सहा जिल्हापरिषद नगराध्यक्ष आणि ७ नगरसेवक आमचे आहेत हिम्मत असेल तर समोरासमोर या कोण संपवतंय ते पाहू असे आव्हान देखील धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना यावेळी बोलताना दिले. दरम्यान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे डिपॉजिट जप्त करू असे वक्तव्य केले होते. या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.
मस्तवाल सत्तेचा शेवट परळीत होतो
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री परळीत आले होते, त्यांनी परळीवर टीका केली. मात्र मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा मस्तवाल सत्तेचा शेवट परळीत होतो. तुम्हाला परळीबद्दल इतकी अडचण आहे तर तुम्ही सुरुवात परळीपासून का केली ? रायगडासारख्या पवित्र भूमितून का केली नाही ? तुमच्या मनात काळं आहे हे यावरूनच स्पष्ट होतंय असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तसंच तुमच्या सोळा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवाल का ? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मुंडे यांनी निशाणा साधला. दरम्यान, या सभेला जोगेंद्र कवाडे, शरद पवार, छगन भुजबळ हेही उपस्थिती होते.