‘पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या ट्विटर वॉर जुंपले आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसालय, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यावर टीका केली होती. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात मुंबई पालिकेत 60 जागा जिंकू. तर दुसरे नेते म्हणतात 50 जागा जिंकू. मुळात राष्ट्रवादीच्या आहे त्या 8 जागा टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याचं इतर प्राण्यांत रुपांतर होत नाही. ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर. विनोदीच आहे सगळं ! पालिकेत अबकी बार भाजप सरकार ! अशा शब्दात आशिष शेलार यांनी ट्विट करून राष्ट्रवादीवर टीका केली होती. यावर रोहीत पवार यांच्यानंतर धनंजय मुंडेंनीही उत्तर दिलंय. पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, असे मुंडे म्हणाले.

दरम्यान, भाजपचे सुरुवातीला दोनच खासदार होते. आज केंद्रात तुमच्या पक्षासाठी आलेले अच्छे दिन हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातील तुमच्या पक्षासाठी आलेले बुरे दिन हे अशाच अहंकाराचं फळ आहे, असे म्हणत आता तरी सुधरा राव असा टोला रोहीत पवार यांनी भाजपला लगावला होता.