आता ती ‘धनूदादा’ हाक कानावर पडत नाही : धनंजय मुंडेंचं भावूक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचं नातं बहीण भावाचं. मात्र, त्यांच्या बहीण-भावाच्या नात्यात असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांनी आपल्या आणि पंकजा मुंडे यांच्या नात्यावर, तसंच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलही आदर व्यक्त करत त्यांनी आपले मन मोकळे केले.

राजकारणात येण्यापूर्वीचं माझं आणि बहिणीचं नातं मला आवडतं. राजकारणात आल्यानंतर आमच्यात जे अंतर पडत गेलं ते व्हायला नको होतं. इतक्या वर्षात आता या नात्यात अंतर पडलं आहे. मला त्यांनी धनुदादा म्हणून हाक मारणं आता कानावर पडत नाही, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तर गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नात्यावर बोलताना, माझं आणि माझ्या काकांचं नातं मी कधीच विसरू शकत नाही. पुढचा जन्म वगैरे हे काही मला मान्य नाही पण तसं जर असेल तर पुढच्या जन्मी माझा त्याच घरात जन्म व्हावा आणि मला तेच काका मिळावेत, असं वाटण्याइतकं आमचं नातं चांगलं होतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.