राष्ट्रवादीला आणखी एक झटका : राष्ट्रवादीच्या नाराज प्रदेश उपाध्यक्षा भाजपच्या वाटेवर

कळवण : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांची उमेदवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निश्चित झाल्याने त्या भाजपात प्रवेश करणार असलयाचे समजते.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपाध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर, नाशिक येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते भाजपा प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, यासंदर्भात, दिंडोरी मतदारसंघातील कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याशी त्यांनी चर्चा केली असून, गुरुवारी सायंकाळी कळवण येथे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, मार्गदर्शक, कार्यकर्ते व समर्थक यांची तातडीची बैठक घेत त्यांनी सर्वांची मते जाणून घेतली. या बैठकीत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. पवार जो निर्णय घेतील तो मान्य राहील, कुठल्याही पक्षाची उमेदवारी केली, तरी डॉ. पवारांच्या पाठीशी उभे राहू, असे म्हणण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे त्याच दिवशी डॉ. भारती पवार भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

इतकेच नव्हे तर, इतर पक्षांतून ऐनवेळी पक्षात आलेल्यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी विचार होत असल्याने आपण अस्वस्थ आहोत. त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांची मते जाणून घेत आहे. आणि लवकरच आपला जो काही निर्णय आहे तो जाहीर करेल. असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी म्हंटले आहे.