एकनाथ खडसेंचा BJP वर घणाघात, म्हणाले – ‘काही काळापासून भाजपमधील काही नेते OBC नेत्यांना टार्गेट करताहेत’

जळगावः पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या चार- पाच वर्षात भाजपचे काही नेतेमंडळी ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला, माझ्यावर बिनबुडाचे आरोप झाले, बदनाम करण्याचे काम केले, चंद्रकांत बावनकुळेंना तिकीट नाकारले. धनगर समाजाचे अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर असतील अशी कितीतरी नाव आहेत. यांचा काहींना काही कारणाने छळ झाला. मात्र पार्टी म्हणून तो प्रत्येकांनी सहन केल्याचे खडसे म्हणाले.

खडसे म्हणाले की, अलीकडे चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांना धमकी दिली. तुम्ही जामिनावर आहात, म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या विरोधात असो की भुजबळ यांच्याबाबत असो ईडी लावण्याचा प्रकार म्हणजे सर्व षडयंत्र यांचेच असल्याचे उघड होत आहे. म्हणजे यांच्या विरोधात बोलले तर ईडी किंवा सीबीआय लावू असा त्याचा अर्थ आहे. मात्र भुजबळ अशा गोष्टींना घाबरत नसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. विरोधकांना कारण नसताना ईडी लावावी अन् त्याचा छळ करवा असे पूर्वी कधी घडत नव्हते. मात्र अलीकडच्या काळात मात्र माझा कोणताही संबंध नसताना केवळ मी पक्ष बदलला म्हणून त्रास देण्यासाठी चौकशा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूर्वी ईडी किंवा अन्य गोष्टी जनतेला माहीत नव्हत्या. त्या आता माहीत होत आहेत. मात्र विरोधकांना दाबून ठेवण्यासाठी जर अशा यंत्रणांचा वापर होत असेल तर ते योग्य नाही. सध्याची परिस्थिती हालाखीची आहे या परिस्थितीमध्ये कोणीही राजकारण करू नये, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली आहे आणि अशाच प्रकारची भूमिका आपण गेल्या महिन्यात मांडली होती. त्यामुळे विरोधक असो वा सत्ताधारी यांनी मतभेद विसरून एकत्र येऊन कोरोनाची लढाई लढली पाहिजे, असे खडसे म्हणाले.