‘गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो’; खडसेंच्या आवाजातील व्हायरल रेकॉर्डिंगमुळे खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  जळगावमध्ये मागील दोन दिवसांपासून जामनेर तालुक्यातील वाकोद जवळील वडगाव येथील एका तरुणाने एकनाथ खडसे यांना केलेल्या मोबाईल कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. तरुणाने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर दोघांमध्ये झालेल्या संवादाने चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘आमदार का करतोय…? बायकांमागे फिरतोय नुसता..!’ व ‘गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो’ असे संवाद कॉल रेकॉर्डिंगमध्ये आहेत.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वांना माहित आहे. याच वादात आता एक कॉल रेकॉर्डिंगची क्लीप व्हायरल होत आहे. या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये खडसे हे आमदार गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील अर्थात जामनेर तालुक्यातील वडगावच्या तरुणाशी संवाद साधत आहेत. या संवादात खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर बोचऱ्या शब्दात केलेली टीका जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

जामनेरच्या वाकोदजवळ असलेल्या वडगाव बुद्रुक गावातील एका गावकऱ्याने एकनाथ खडसे यांना फोन केला होता. त्याने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर एकनाथ खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का, असे म्हटले. त्यावर गावकऱ्याने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे तो गिरीश फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली.