एकनाथ खडसे यांचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह, सूत्रांची माहिती

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप, सर्दी आणि खोकल्याचा सौम्य त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसेंनी आपली कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, खडसे यांच्याकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. गेल्या महिन्यातही खडसे यांनी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान खडसे यांची ED ची चौकशी होण्याआधीच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांना पुण्यातील भोसरी MIDC तील एका भूखंड प्रकरणी ED ने नोटीस बजावून 30 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, खडसे यांनी त्यापूर्वीच ED ला पत्र लिहून आपल्याला कोरोना सदृश्य लक्षण आढळल्याने चौकशीसाठी 14 दिवसांची मुभा मिळावी, असे विनंती केली होती. ED ने त्यांची विनंती मंजूर देखील केली होती.

याबाबत एकनाथ खडसे यांनी पत्रात म्हटले होते की, ED च्या मुंबईतील कार्यालयात उपस्थित होण्यासाठी समन्स प्राप्त झाले आहे. त्यासाठी मी मुंबईलाही पोहोचले आहे. मात्र, 28 डिसेंबरला आपल्याला ताप, सर्दी, खोकल्याचा सौम्य त्रास जाणवला. वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी केली असता रिपार्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, खडसे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार 14 दिवस विश्रांती आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आता प्रकृती बरी झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयास पूर्ण सहकार्य करणार असल्याचे खडसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.