‘त्या’ प्रकणात एकनाथ खडसे 2 दिवसांत कागदपत्रांसह मोठा धमाका करण्याची शक्यता, अनेक दिग्गजांचे धाबे दणाणले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या दोन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर प्रकरणात चौकशी सुरू असल्याने यादरम्यान बोलणे योग्य ठरणार नाही. आपल्याकडे याविषयीची कागदपत्रे, पत्रव्यवहार असून येत्या दोन दिवसात ही सर्व माहिती पत्रकार परिषद घेऊन देतो अशी माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (ncp-leader-eknath-khadse) यांनी यांनी एका दैनिकाला दिली आहे. यात जिल्ह्यातील दिग्गजच अधिक असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याची पण माहिती असून ती देणार असल्याचेही खडसे म्हणाले.

बीएचआर संस्थेतील अपहार, गुंतवणूकदारांची देणी न देणे, संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे व पुणे येथे दाखल गुन्ह्या संदर्भात जळगावात आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे‌. यासंदर्भात खडसे म्हणाले, याविषयी आपण राज्य सरकारकडे 2018 पासूनच 15 ते 16 केल्या आहेत. सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवरदेखील दिल्ली येथे व अ‍ॅड. कीर्ती पाटील यांनी देखील तक्रारी केल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.

या पूर्वीच्या फडणवीस सरकारने कारवाई थांबवून ठेवली

दोन वर्षांपूर्वी तक्रारी केल्या तरी या पूर्वीच्या राज्य सरकारने कारवाई थांबवून ठेवल्याचा आरोपदेखील खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला. या गैरव्यवहार प्रकरणी प्रथम राज्य सरकारकडे आपण तक्रारी केल्या होत्या. मात्र बीएचआर संस्था मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा2002 प्रमाणे या संस्थेवर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने राज्याचे सहकार आयुक्त यावर कारवाई करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी हा चौकशी अहवाल सरकारला पाठविला होता. त्यानंतरही राज्य सरकारने चौकशी थांबवून ठेवली होती असे खडसे यांचे म्हणणे आहे.

आताच माहिती दिल्यास चौकशीत हस्तक्षेप केल्यासारखे होईल
या प्रकरणात जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी मंत्रीदेखील अडकले असून त्यांनी संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतली आहे. या सर्वांचीदेखील चौकशी होणार असून आत्ताच माहिती दिल्यास चौकशीत हस्तक्षेप केल्यासारखे होईल. ते योग्य होणार नाही म्हणून चौकशी संपल्यानंतर दोन दिवसात सर्व माहिती व कागदपत्रेदेखील देतो असे खडसे म्हणाले. खडसे यांनी दोन दिवसात संपूर्ण कागदपत्रेदेखील देतो असे सांगितल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यातील राजकारण काय वळण घेते व कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like