Sangli News : राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केली ‘मुख्यमंत्री’पदाची इच्छा, अजित पवारांचाही पाठिंबा !

इस्लामपूर/सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निकालानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रवादी, काँग्रेससोबत महाविकास आघाडी (MVA) करुन राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे जास्त जागा जिंकून देखील भाजपला (BJP) विरोधी पक्षात बसावे लागले. राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (Government) अनेक नेते हे मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असल्याचं मानलं जात. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) इच्छुकांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं विधान केलं आहे.

इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेस वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, असे स्पष्ट विधान जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता जयंत पाटील हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानलं जात आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना जयंत पाटील यांनी सावध भूमीका मांडली, ते म्हणाले, आमच्या पक्षाकडे सध्या ते पद नाही. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. ती संख्या पुरेशी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे त्यांनी सांगतिल. तसेच मंत्रीपदापेक्षा प्रदेशाध्यक्षपद भवतं असेही त्यांनी सांगितलं.

अजित पवारांचा पाठिंबा
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. जयंत पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल तर मी पाठिंबा देतो असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांना पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्रीपदावरुन आणखी राजकारण रंगण्याची शक्यता आहे.