मंत्री जयंत पाटलांची केंद्राकडे मागणी, म्हणाले – ‘ऑक्सिजनवरील GST हटवा’

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. त्यात ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अशातच कोरोना उपचारात महत्वाचा असलेल्या ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील GST हटवण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. जीएसटी हटवल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.

ऑक्सिजनवरील GST कमी करण्याबाबत नुकतेच द असोसिऐटेड चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेने अर्थमंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला होता. त्याच पत्राचा आधार घेत जलसंपदा मंत्री पाटील यांनी देशात कोरोना संकटात औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांचा तुटवडा भासत आहे. अशावेळी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील GST हटवावी, अशी मागणी पाटील यांनी अर्थमंत्रालयाकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींचा पुरवठा कमी होत असल्याने राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद सुरु होता. त्यानंतर आता लसींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर आक्षेप घेतला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून व्हॅक्सिन खरेदीवरील जीएसटी कर माफ करण्याची मागणी केली आहे. त्या मागणीवरून आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका गांधी यांनी केली आहे.