चोराने माफी मागत परत केली चोरलेली कोरोनाची लस; जयंत पाटील म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसचे मोठे संकट आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, रुग्णालयातून एका चोराने कोरोना प्रतिबंधक लस चोरून नेली. पण त्याने ती परत दिल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

हरियाणातील एका चोराने गुरुवारी रात्री रुग्णालयात चोरी केली होती. मात्र, त्याने चोरी करताना कोरोना प्रतिबंधक लस चोरून आणल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर या चोराने दुसऱ्या दिवशी लगेचच ही लस परत केली. लस परत करताना त्याने सोबत एक चिठ्ठीही ठेवली. ‘सॉरी, मला माहीत नव्हतं की ही लस आहे’, असं त्यानं चिठ्ठीत नमूद केले, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘कोरोनापासून माणसाचा जीव वाचवू शकणाऱ्या औषधांचा साठा आणि काळाबाजार जे करत आहेत, त्यांनी यातून धडा घ्यायला हवा.’

दरम्यान, देशभरात कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यावरून राजकारण केले जात आहे. महाराष्ट्रातही लसींचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. मात्र, चोराने चोरलेली लस परत आणून देत चिठ्ठीतून माफी मागितल्याने अजूनही माणूसकी जिवंत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.