आप करो तो रासलिला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, आव्हाडांचा मोदींवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा पाठवल्या. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका केली आहे. आव्हाडांनी त्यांच्या ट्विटरवर आणि फेसबुकवरून पोस्ट करत मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तान हा जर इतका बदमाश देश आहे. तर मग त्याला हे चोरून प्रेमपत्र पाठवायची काय आवश्यकता आहे ? असा सवाल आव्हाडांनी केला आहे. तसंच आप करो तो रासलिला, हम करे तो कॅरेक्टर ढिला..! असं म्हणत आव्हाडांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

पाकिस्तानला शुभेच्छा देण्यात गैर काहीच नाही. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायचा थांबवलं, तर आपल्यालाही पाकिस्तानशी वैर ठेवण्यात काहीही रस नाही. उलट मैत्रीच हवी आहे. मात्र पाकिस्तानला शुभेच्छांचा संदेश भारतातर्फे पाठवला गेला, हे आपल्याला भारत सरकारकडून कळले नाही. तर पाकिस्तान कडून कळले, असं म्हणत मोदींवर निशाणा साधला.

इम्रान खानने ट्विट करुन मोदी यांनी आपल्याला हा संदेश पाठवल्याचं जाहीर केलं. मग नरेंद्र मोदी यांनी हे जाहीर का केलं नाही ? या गोष्टीचा विचार केला तर मोदी यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. एकीकडे अहोरात्र पाकिस्तानच्या नावाने शिमगा करायचा आणि दुसरीकडे चोरुन लव्हलेटर पाठवत बसायचं हाच तो दुटप्पीपणा आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मोदी यांनी आपल्या भाषणांमधून पाकिस्तानवर अहोरात्र टीका केली. देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा गंभीर प्रश्नांवर मोदी काही बोलत नाहीत. फक्त पाकिस्तानबद्दल द्वेष व्यक्त करतात. मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि पाकिस्तानचा भावनात्मक मुद्दा पेटवत ठेवायचा ही मोदींची कूटनीती आहे, असा आरोप आव्हाडांनी केले.

तुम्ही वैयक्तिक संदेश पाठवणार. आणि लोकसभेच्या लढाईत तुम्ही पाकिस्तानच्या नावाने ठो…ठो बोंबलत, गेल्या पाच वर्षातले तुमच्या अपयशाचे सगळे मुद्दे बाजून ठेऊन पाकिस्तानचे आम्ही कसे विरोधक आहोत हे दाखवणार. त्याच पाकिस्तानला तुम्ही गणतंत्र समृद्ध होवो अशा शुभेच्छा देता. या तुमच्या शुभेच्छा जगात जाहीर कोण करतो ..! तर इम्रानखान करतो. म्हणजे आम्हीच मुर्ख. आम्ही पाकिस्तानच्या नावाने बोटं मोडत बसायचं, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.