निर्मला सीतारामन यांच्या ‘त्या’ विधानावरून आव्हाडांचा निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गामुळे डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

रविवारी निर्मला सीतारामन यांनी पाचवी पत्रकार परिषद घेऊन २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील शेवटचा टप्पा विस्तृतपणे सांगितला.

त्याच वेळी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरून सीतारामन यांना प्रश्न विचारला असता, अर्थमंत्र्यांनी संताप व्यक्त करत. राहुल गांधी मजुरांसोबत बसून चर्चा करतात, ही ड्रामेबाजी नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित होता. राहुल गांधींनी मंजुरांसोबत बसून, त्यांच्याशी चर्चा करून या कामगारांचा वेळ वाया घालवला. खरंच, मदतीसाठी गेले होते, मग या मजुरांसोबत चालत जाऊन, त्यांच्या हातातील सामान घेऊन जायला हवं होत. असं म्हणत अर्थमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निर्मला सीतारामन यांच्यावरती टीकास्त्र सोडलं आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर म्हटलं की, स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे तसेच त्यांच्यासोबत चालणे ही राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे, असं निर्मला सीतारामन यांचं म्हणणे आहे. त्यामुळे जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामाबाजी आहे, तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होते. असं मत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे शहरातील स्थलांतरीत मजूर अनेक संकटांचा सामना करत आपल्या गावी परतत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुखदेव विहार भागात आपापल्या राज्यात जाण्यासाठी निघालेल्या मजुरांची भेट घेतली होती. तसेच, त्यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधानांना न्याय योजनेच्या धर्तीवर आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती.