राष्ट्रवादीच्या ‘गृह’ कारभारावर राऊतांचा निशाणा, आव्हाडांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला आता दोन महिने होत आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता सीबाआयने सुरू केला आहे. सीबीआयने याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकावणे यासारखे गुन्हे सर्वांवर नोंदवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुशांतच्या आत्महत्येप्रकरणाला राजकीय वळण लागल्याने शिवसेनेचे नेते संजय राऊत देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यावरच निशाणा साधला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तपास खेचल्याबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहखात्यावर निशाणा साधला आहे. यावर राष्ट्रवादीने अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल केलेत असं आपल्याला वाटत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोकठोक या सदरातुन सिशांत सिंह प्रकरणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्याने राऊत यांनी पोलिसांवर टीका करून थेट गृहखात्यावरच निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. याबाबत माध्यमांनी जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता आव्हाड यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. राऊत यांनी पोलीस खात्याबाबत काही सवाल केलेत असं मला वाटत नाही. तपास हा कायद्याच्या कक्षेत सुरु असतो आणि काद्याच्या कक्षेतच पुढ जात असतो, अशी मोघम प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

काय म्हणाले राऊत ?
मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीजना रोज चौकशीला बोलवायचे व गॉसिपला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पहायला हवे, असे राऊत यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगळे का झाले ? मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नको तितका का खेचला ? हे प्रकरण हाय प्रोफाईल होत असल्याचं दिसताच पोलिसांनी माध्यमांना त्याबाबत दिवसाआड माहिती का दिली नाही ? असा सवाल करत संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांनाही धारेवर धरले आहे.