कोण गोपीचंद पडळकर, त्याची ‘औकात’ काय ? संतप्त आव्हाडांनी दिला सज्जड इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भाजपकडून नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे वादग्रस्त विधान आमदार पडळकर यांनी पंढरपुरमध्ये केले होते. त्यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे प्रचंड संतापले आहेत. कोण गोपीचंद पडळकर, त्याची औकात काय ? असा सवाल त्यांनी केला आहे. आपण काय बोलतो ते कळतं का ? त्यांची उंची किती आणि ते बोलतात किती ? सध्याच्या कोरोना संकट काळात पडळकरांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं. शरद पवार यांच्यावरील टीका खपवून घेतली जाणार नाही. कॅमेऱ्यावर मी काही सांगणार नाही. पण याचे तीव्र पडसाद उमटतील. ते महाराष्ट्र पाहील, असा सज्जड इशारा जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना दिला आहे. शरद पवार यांचं महाराष्ट्रासाठी काही योगदान नाही, असं म्हणणारा व्यक्ती वेडा आहे, नाही तर त्याचा पब्लिसिटी स्टंट आहे, असंही आव्हाड यांनी सांगितलं.

काय म्हणाले होते पडळकर ?

गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजांना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम शरद पवार हे करत आहेत, अशी जहरी टीका पडळकरांनी केली .

धनगर समाजाच्या आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. फक्त आरक्षणाचे राजकारण शरद पवार करत आहेत. अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.