अभिनेत्री दीपाली सय्यद बद्दल राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणतात – ‘बाबुल की दुआए लेती जा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने अभिनेत्री दिपाली सय्यद हिला कळवा मुंब्रा मतदार संघात उतरवले आहे. दिपाली सय्यद पंधरा दिवसांसाठी आलेली आमची माहेरवाशीण बहीण असून तिला माहेरी खूप माया दिली जाईल आणि त्यांनतर दीड लाखांच्या फरकाने तिला सासरी पाठविण्याची व्यवस्था देखील केली जाईल असे विधान आव्हाड यांनी दिपाली सय्यदविषयी माध्यमांशी बोलताना केले आहे. याशिवाय आव्हाड यांनी दिपाली सय्यद यांच्यासाठी ‘बाबुल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मायके की कभी ना याद आये, ससुराल मे इतना प्यार मिले…’ हे खास गाणेही गायले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, ‘दिपाली ही पंधरा दिवसांसाठी आलेली आमची माहेरवाशीण बहीण असून आमच्या मानवी धर्माप्रमाणे तिचं खूप औक्षण होईल, तिला खूप माया दिली जाईल आणि त्यांनतर दीड लाखांच्या फरकाने तिला सासरी पाठविण्याची व्यवस्था देखील केली जाईल.’

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा एकदम सुरक्षित मतदारसंघ म्हणून मुंब्रा या मतदारसंघाची ओळख आहे. कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणाहून आतापर्यंत जितेंद्र आव्हाड दोनदा निवडून आले आहेत. दरम्यान युतीच्या उमेदवार म्हणून अभिनेत्री दिपाली सय्यद या रिंगणात आहेत. दीपाली सय्यदने 2014 च्या निवडणुकीच्या वेळी आम आदमी पार्टीच्या तिकिटावर अहमदनगरमधून निवडणूक लढवली होती. दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी आप सोडून विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेते प्रवेश केला होता.

visit : Policenama.com