अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांची आपला राजीनामा दिला असून बागडे यांनी अजित पवार यांचा राजीनामा स्विकारला आहे. त्यांच्या राजीनामा देण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, एक महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या असताना अजित पवारांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

शरद पवार हे पुण्यात पुरग्रस्त भागाचा दौरा करत असताना अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे अद्याप पक्षातील नेत्यांनाही माहित नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ते दुसरी मोठी जबाबदारी स्विकारण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. तर, कदाचीत त्यांना सातारा लोकसभा निवडणुकीत उतरवण्यात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दोन ते तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी हरिभाऊ बागडे यांना फोन केला होता. आज अजित पवार यांनी आज मुंबईतील विधानसभा कार्यालयात येऊन पीए सागर यांच्याकडे राजीनामा दिला. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास त्यांनी राजीनामा दिला आणि मला फोन करून राजीनामा दिला असल्याचे कळवले. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केला असून हा राजीनामा त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिला असल्याचे बागडे यांनी सांगितले.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल झाले असून त्यांच्याशी नेत्यांचा संपर्क होऊ शकत नाही. अजित पवार यांनी राजीनामा देताना पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना अंधारात ठेवले आहे. कोणालाही कल्पना न देता अचानक अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने पक्षामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी आपल्याला देखील त्यांनी राजीनामा कोणत्या कारणामुळे दिला हे समजू शकले नसल्याचे सांगितले