Maratha Reservation : ‘राजकारण न करता सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी’ – रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. मराठा आरक्षणावरुन राजकीय आखाडा चांगलाच तापू लागला आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली असून जे वकील आधीच्या सरकारने दिले होते. तेच वकील आपण कायम ठेवले होते असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया देत आरोप-प्रत्यारोप केले. यामुळे मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण पेटण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी म्हटले की, मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय कोर्टानं दिला आहे. यामुळे माझ्या सारख्या अनेकांना वाईट वाटत आहे. आरक्षण मिळालं असतं तर अनेकांना याचा फायदा झाला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे मी फक्त एकच विनंती करेन की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन यावर चर्चा करावी. मराठा समाजामधील युवा वर्गाच्या हिताचा निर्णय राज्य पातळीवर कसा घेता येईल ? याबाबतचा विचार करण्याची गरज आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणावरुन कोणीही राजकारण करु नये. कारण जे वकील आधीच्या सरकारने दिले होते. तेच वकील आपण दिले होते. त्यांनी चागंल्याप्रकारे युक्तीवाद केल्याचे आपण पाहिले आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा असतो, असेही रोहित पवार यांनी सांगितले.