पंतप्रधान ‘मन की बात’ किंवा भाषणात चांगलं बोलतात, परंतु कृती काहीच करत नाहीत – खा. सुप्रिया सुळे

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – अंबरनाथ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘मन की बात’ मधून एक फोन करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. मात्र, प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान मोदी हे मन की बात मधून किंवा भाषणात चांगलं बोलतात. पण कृती काहीच करीत नाहीत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात. परंतु माझ्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत. यावरुन मोदींचे अश्रू नेमके कुणासाठी आहेत हे लक्षात येते, असा हल्लाबोल त्यांनी केला.

शरद पवार यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली होती. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांना ईडीची नोटीस आली आणि राज्यात गेमचेंज झाला. यावेळी महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असल्याचे सांगताना साताऱ्याच्या पावसातील सभेने महाराष्ट्राचे चित्र बदलले, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात खासदारांचा 12 कोटींचा निधी कापला. आम्ही कोरोना काळ असल्याने मान्यही केले. मात्र, मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरु केले. तोच निधी एखाद्या रुग्णालयाच्या उभारणीला दिला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. ज्याची गरज नसताना हा उपद्व्याप का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.