‘राज्यात राष्ट्रपती राजवट अशक्य, लोक महाविकास सरकारच्या कामावर समाधानी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधक कोरोना, मराठा आरक्षण, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आदी प्रश्नावरून ठाकरे सरकारला घेरताना दिसत आहेत. ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविणा-या भाजपने राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार असल्याचा सूर आवळला होता. मात्र राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावणे अशक्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी सुरुवातीलाच राज्यातील 3 पक्षाचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे सांगत फाटाफूट होऊन पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा दावा केला होता. मात्र, या गोष्टीला आता 15 महिने उलटून गेल्यानंतर हा बाजा वाजवणे आता बंद झाले आहे. आता ते पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहेत. कारण, भाजपकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. पण हे अशक्य आहे. कोणत्याही राज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नसल्याचे मलिक म्हणाले. दरम्यान दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये बऱ्याच लोकांची नावे असून यात काही भाजप नेत्यांचीही नावे आहेत. पोलीस तपास करत आहेत. हा तपास रोखण्यासाठी दबाव आणला जाऊ नये. मनसुख हिरेन प्रकरणातही सत्य लवकरच समोर येईल. तोपर्यंत कोण काय म्हणतंय यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मलिक यांनी केले आहे.