Nawab Malik : ‘रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला राम भरोसे सोडले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. बाधितांची वाढती संख्या आणि मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडेही अपुरी पडू लागल्याचे चित्र काही ठिकाणी पहायला मिळत आहे. अशातच बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. बक्सरच्या चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात मृतदेहांचा खच आढळून आला आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधून हे मृतदेह वाहून आल्याची शक्यता येथील प्रशासनाने व्यक्त केली आहे. या घटनेवरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली असतानाच रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला राम भरोसे सोडले असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटला रिट्विट करत नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

दरम्यान, चौसातील घाटाच्या परिसरात ४० ते ४५ मृतदेह आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे येथील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हात झटकले असून हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आल्याचे म्हंटले आहे तर चौसाचे बीडीओ अशोक कुमार यांनीही तीच शक्यता वर्तवली आहे. ते म्हणाले गंगा नदीत हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत येत असून इथे आढळून येत आहेत. यावर सध्या आमच्याकडे कोणताही उपाय नाही. आढळलेल्या ४० ते ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यासाठी आम्ही एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली असल्याचेही त्यांनी सांगितले.