भाजपाला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीचा प्लॅन ? चर्चेला उधाण आल्यानंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू आणि पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांना फटकारल्यामुळे राज्यात राजकीय चर्चा सुरु असताना आता राष्ट्रवादी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. भाजपात गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेत राष्ट्रवादीकडून राज्यात ‘मिशन घरवापसी’ राबवण्यात येणार असल्याच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. गयारामांना पुन्हा पक्षात घेण्याची जबाबदारी शरद पवार यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे सोपवल्याची चर्चा आहे.

यावर आता राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, भाजपमध्ये जे आमदार गेले त्यांना तिथं किंमत नाही. त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादीत येऊ पहात आहेत. हे आमदार शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत संपर्कात आहेत. असे आमदार स्थानिक राजकारणाचा विचार करून पक्ष प्रवेश करत आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या भूमिकेवर बोलताना म्हणाले, पार्थ तरुण नेते आहेत. त्यांचा अनुभव कमी आहे. पार्थ वक्तव्य गांभीर्याने घेण्यासारखे नाही. तरुणांकडून चुका होतात त्यात सुधारणा करता येतात, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार याच्यात बुधवारी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचे समजतय.