‘महाराष्ट्राची प्रशंसा विरोधी पक्षनेत्यांना पचत नाही’; राष्ट्रवादीचा खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात महाराष्ट्राच्या कामाची नोंद घेतली जात आहे. मुंबई मॉडेलची चर्चा होत आहे. परंतु हे पचत नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राबाबत खोटी बातमी पसरवण्याचे काम करत आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

कोरोनाच्या बाबतीत गंभीरतेने राज्य सरकार काम करत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या किंवा मृतांची संख्या लपवली नाही. राज्यात 6 हजार 200 लॅब तयार करण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त आरटीपीसीआरच्या टेस्ट करण्यात आल्या. ही सर्व माहिती उघडपणे जनतेसमोर ठेवल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. सुप्रीम कोर्ट किंवा विविध कोर्ट, निती आयोग यांनी कामाची प्रशंसा केली. हेच विरोधी पक्षनेत्याला पचत नाही, अशी खोचक टीका मलीक यांनी केली.

आघाडी सरकारला बदनाम करण्याचा उद्योग सुरु

गुजरातमध्ये 71 दिवसात 61 हजार कोरोना पॉझिटिव्ह केसेस लपवण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. गोव्यात ऑक्सिजन मिळत नसल्याने रोज लोकांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशात दोन हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आल्याचे वृत्त आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आहे ते विफल झालं आहे, असे दाखवून महाराष्ट्रातील चांगलं काम यांना पचत नाही. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा उद्योगच यांनी सुरु केला आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

यावर इलाज करु शकत नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील चांगली कामे दिसत नसतील तर यावर इलाज करु शकत नाही. परंतु महाराष्ट्रात चांगली कामे होत आहेत, हे सत्य आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.