‘कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होते !’, फडणवीसांवर राष्ट्रवादीचा ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ होतच असते. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. त्याला मलिक यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

कोंबड्याला वाटतं की मी आरवलो नाही तर सकाळ होणारच नाही पण प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. कोंबडा झोपला तरी सकाळ होते हे फडणवीस यांनी लक्षात घ्यावे, असा टोला मलिक यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आमचे नेते शरद पवार, किंवा इतर मंत्री असतील सर्वच जण अन्नदाता अडचणीत आल्यावर त्यांना धीर देण्यासाठी शेताच्या बांधावर जातात. त्याचे अश्रू फुसत त्यांना धीर देण ही पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे फडणवीस यांनी उगाचच काहीही दावे करू नये असे ते म्हणाले.

सरकार कॅबिनेटच्या बैठकीत मदत जाहीर करेल
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कुठल्याही शेतकऱ्याला या अडचणीच्या काळात वा-यावर सोडणार नाही. त्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार आहे. येत्या कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरूपाने मदत जाहीर करेल, असे मलिक यांनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे.तर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर केंद्राचीही मदत करण्याची जबाबदारी असल्याचेही नवाब मलिक यांनी नमूद केले.

मदतीवरून राजकारण चांगलच तापलं
परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वेगवेगळ्या भागांत दौरे करत आहेत. या निमित्ताने राजकारणही बरंच तापलं आहे. फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर त्याला मुख्यमंत्री ठाकरे आणि पवारांकडूनही उत्तर मिळालं आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून फडणवीसांवर बोचऱ्या शब्दांत टीका झाल्याने हे वाकयुद्ध अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

You might also like