…म्हणून पेट्रोल-डिझेलवरील ‘सेस’ कमी करावा : आ. रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   वाढत्या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे; मात्र एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा, अशा मागणीचे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. हे ट्विट रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारामन यांना टॅग केले आहे.

केंद्र सरकार इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अर्थमंत्रालय त्यावर सकारात्मक विचार करत असून राज्ये, तेल कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, इंधनावरील कर कधीपर्यंत कमी होईल, हे मी सांगू शकत नाही, परंतु केंद्र आणि राज्यांना मिळून इंधनावरील कर कमी करावा लागेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांतील इंधन दरवाढ पाहता काही राज्यांनी आपल्या स्तरावर पेट्रोल-डिझेलवरील कर देखील कमी केला आहे.