जयंत पाटलांच्या इच्छेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘के न्यूज इस्लामपूर’ या युट्युब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी जयंत पाटील यांनी ही इच्छा बोलावून दाखवली आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

जयंत पाटील या मुलाखतीत म्हणाले की, आमच्या पक्षाकडे (राष्ट्रवादीकडे) अजून मुख्यमंत्रिपद आलेलं नाही. यावर तुमची इच्छा आहे का?, असा सवाल जयंत पाटील यांना मुलाखतीत विचारण्यात आला. “दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही वाटणं स्वाभाविक आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील”, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

तसेच मुख्यमंत्रिपद मिळावं ही पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा असते. माझ्यासोबत मतदारांना देखील आपण मुख्यमंत्री बनावं, अशी इच्छा असेल, असं जयंत पाटील यांनी सांगितले. परंतु, सध्याची परिस्थिती आणि पक्षाच्या आमदारांची संख्या पाहता हे शक्य नाही. आम्हाला आमदारांची संख्या वाढवावी लागेल. पक्ष संघटना मजबूत करावं लागेल, असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

”आपल्या हातातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतूने जयंत पाटील असं काही बोलले असावेत. जयंतराव यांचं त्यांच्या मतदारसंघासोबतच पूर्ण राज्यात मोठं काम आहे. लोकांना केंद्रबिंदू ठेवून जयंत पाटील राज्यभर फिरत असतात. मुख्यमंत्री म्हटलं की काम करताना आणखी ताकद मिळते”, अशी सावध प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली.

प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते – जयंत पाटील

मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे किंवा अजित पवार या दोघांपैकी एकाला पाठींबा देण्याची वेळ आल्यास कोणाला पाठींबा देणार या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, “मुळात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना वेगवेगळं समजणं चुकीचं ठरेल. ते एकाच घरातील आहेत”