पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सतत वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे सगळ्यांनाच झळ बसत आहे. या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने रविवारी (दि. 28) राज्यभर चुल मांडा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. मोदींची जाहिरात असलेल्या राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सकाळी अकरा वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.

दिवसेंदिवस गॅस आणि इंधनाचे दर गगनाला भिडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक पेट्रोलपंपावरील जाहिरात ही सामान्यांना अच्छे दिनचा खोटा आशावाद देत असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे. ज्या पेट्रोलपंपावर मोदींचा बॅनर किंवा जाहिरात झळकत आहे, त्या ठिकाणी दगडाची किंवा विटांची चूल मांडण्यात येणार आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ स्वयंपाकासाठी आता दगडाची आणि विटाची चूल पेटवण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचा प्रतिकात्मक निषेध यातून केला जाणार असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त महिला कार्यकर्त्यांनी तसेच सर्वसामान्य गृहिणींनी सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून सहभागी व्हावे असे आवाहन चाकणकर यांनी केले आहे.