धक्कादायक ! Sanitizer मुळं कार पेटल्यानं राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदेंचा मृत्यू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा येथे कारमधील वायरींगचे शॉर्ट सर्कीट झाल्यानं आग लागली. त्यातील सॅनिटायजरनं पेट घेतला. या आगीनं कार लॉक झाली. त्यामुळं पेटलेल्या कारमध्ये अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय चंद्रभान शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

जगभर द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या साकोरे मीग (निफाड) जवळ ही घटना घडली. शिंदे साकोरे मीग येथील द्राक्ष निर्यातदार होते. साकोरे मीगच्या उपसरपंच निर्मला शिंदे यांचे ते पती होते. दुपारी 12 वाजता हा बर्निंग कारचा थरकाप उडवणारा थरार घडला. कारनं पेट घेतल्यानंतर नागरिकांना ही घटना समजली. त्यांनी आग विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेचा अग्निशामक दलाचा बंब देखील घटनास्थळी दाखल झाला. नागरिकांनी काच फोडून शिंदे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना बाहेर काढलं तेव्हा खूप उशीर झाला होता. अग्निशामक दलानं आग विझवली.

शॉर्टसर्किटमुळं ठिणगी उडाली आणि त्या कारमधील सॅनिटायजरनं पेट घेतला आणि आग लागली. त्यात शिंदेंचा दुर्दैवी मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज आहे.

द्राक्षांच्या छाटणीनंतर बागेच्या फवारणीसाठी लागणारी कीटकनाशकं घेण्यासाठी शिंदे साकारे येथील निवासस्थानातून पिंपळगावकडे निघाले होते. त्यांची मारूती सियाज कार (एम एच 15 एफ एन 4177) साकोरा फाट्यावर महामार्गाला लागताच कादवा नदीच्या पुलाजवळ कारनं पेट घेतला. आगीमुळं कारचे दरवाजे बंद झाले. कारमध्ये सॅनिटायजरची बाटलीसह डिझेल, टाकी व लेदरसिट कव्हर असे ज्वलनशील पदार्थ असल्यानं आगीची तीव्रता वाढली. धुराचे लोट बाहेर पडू लागले. दरवाजे उघडण्याचा व काच फोडण्याचा शिंदे यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे ठरले. कारमध्ये धूर आणि आगीच्या ज्वालांनी शिंदे होरपळले. त्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत शिंदे यांच्या मृत्यूनं साकोरे गावावर शोककळा पसरली. समाजकारण, राजकारण यात सक्रिय असलेल्या शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. साकोरे मीगच्या उपसरपंचपदी त्यांची पत्नी निर्मला शिंदे यांची दोन महिन्यांपूर्वी निवड झाली होती. त्यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी दोन मुलं, सुना असा परिवार आहे.